गडचिरोली दि. ७: गडचिरोली जिल्ह्यातील दोन बालकांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जनसामान्यात असलेल्या अंधश्रद्धा व तातडीच्या वैद्यकीय उपचाराविषयीची अनास्था याबाबत जनजागृतीची निकड लक्षात घेता, अहेरीचे अपरजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हा प्रशासनामार्फत अभिनव लोकजागर मोहीम राबवून जीमलगट्टा परिसरातील नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलनाची व प्राधान्याने वैद्यकीय उपचार घेण्याची शपथ दिली.
नक्षलग्रस्त व अति दुर्गम भागात असलेल्या येर्रागड्डा येथे प्रत्यक्ष जाऊन मृत्यू पावलेल्या मुलांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांची सांत्वना , घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी चौकशी करून दुःख ओढवलेल्या दांपत्याच्या उपस्थितीत गावकऱ्यांसोबत संवाद साधत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी माडिया व तेलगू भाषेत शपथ घेण्यात आली. जीमलगट्टा येथे परिसरातील सर्व आशा वर्कर , ग्रामसेवक तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आणि उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी , गटविकास अधिकारी आहेरी, तालुका आरोग्य अधिकारी,आहेरी, परिसरातील गावांचे उपसरपंच गोविंदगाव/ येर्रागड्डा, जिमलगट्टा आणि मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि विद्यार्थी यांचे उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन बाबत तेलुगु व माडिया भाषेत संवाद साधण्यात आला . सर्वांना अंधश्रद्धा निर्मूलनाची शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या बाबतीत सामान्य जनतेला प्रत्यक्ष मिळालेले लाभ आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्या निराकरण करण्याचे निर्देश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले. आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य सेवा पुरवण्याचे तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि अशा दुर्गम भागात सेवा देण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जीमलगट्टा , उपकेंद्र गोविंदपुर येथे भेट देऊन वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांशी संवाद साधण्यात आला.. लोकजागराचे पोस्टर्स गावामध्ये लावण्याची कार्यवाही करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि गावाचे विकासदूत बनण्यासाठी स्थानिकांना विशेषतः युवकांना आवाहन करण्यात आले.
शपथ — माझे जीवन अमूल्य आहे तसेच माझ्या परिवारातील, समाजातील आणि या देशातील सर्वांचे जीवन अमूल्य असून तोच विकासाचा आधारबिंदू आहे याची मला जाणीव झाली आहे. यापुढे मला किंवा इतरांना कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास मी तात्काळ नजीकच्या दवाखान्या मध्ये जाऊन उपचार घेईल. पुजारी, गावठी वैदू यांच्यावर विश्वास ठेवल्यास जीवन धोक्यात येऊ शकते याची मला पूर्णपणे जाणीव झाली आहे. या पुढे मी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही अशी मी ईश्वर साक्षीने शपथ घेत आहे… जय सेवा…..