महागाव खुर्द येथील महिलांचा पुढाकार
अहेरी (चीफ ब्युरो) दि. ०६ : तालुक्यातील महागाव खुर्द येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी मुक्तिपथ-शक्तीपथ संघटनेने पुढाकार घेतला आहे. या संघटनेच्या महिलांनी दारूविक्री बंदीचा निर्णय नुकताच घेतला असून आपल्या गावातील शांतता-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय आहेत. नुकतेच महिलांनी नदीपरिसरातील 53 ड्रम गुळाचा सडवा नष्ट करून दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान करीत चांगलाच धडा शिकविला आहे.
महागाव खुर्द येथे अवैध दारूविक्री होत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील दारूविक्री थांबविण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. त्यामुळे गावात आयोजित ग्रामसभेत गावातील अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन विक्रेत्यांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले होते. निर्णयाचे उल्लंघन होऊ नये यासाठी गावातील महिला प्रयत्नरत आहेत. परंतु, नजीकच्या गावातील लोक नदीपरिसरात हातभट्टी लावून परिसरात अवैध दारूविक्री करीत आहेत. त्यामुळे महागाव खुर्द येथील मुक्तिपथ-शक्तीपथच्या महिलांनी दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. अशातच नदीपरिसरात दारूविक्रेत्यानी हातभट्टी लावली असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे मुक्तिपथ चमू व महिलांनी संयुक्तरित्या शोधमोहीम राबविली असता, विविध ठिकाणी 53 ड्रम गुळाचा सडवा व साहित्य आढळून आले. महिलांनी संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून दारूविक्रेत्यांना चांगलाच धडा शिकविला आहे. आपल्या गावातील दारूविक्रीसह व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेत पोलिस पाटील चंद्रकला कोडापे, मुक्तिपथच्या नंदिनी आशा, शक्तिपथ संघटनेच्या वंदना तुकाराम नैताम, गंगुबाई सिडाम, सोनिया सिडाम, माधुरी आलाम, मंजुळा तलांडे, सुषमा आलाम, मंदा मडावी, माधुरी सिडाम, जनाबाई आलाम, सुरेखा आलाम, माधुरी कुसराम, पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.