जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चरला वनविभागाचा आशिर्वाद..!

         गडचिरोली : वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामासाठी वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या वनपट्ट्याच्या जमिनीतून रात्रो  मुरुम उत्खनन  करुन रात्रो वाहतूक करणाऱ्या जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वनगुन्हा दाखल करावा, तसेच याप्रकरणी दोषी वनकर्मचाऱ्यांना निलंबित करावे, या मुख्य मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघाडे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी १९ जूनपासून गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वनविभागाशी संबंधित इतरही अनेक मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत.

      वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे कंत्राट जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही कंपनी रेल्वेमार्गाचे रॅम्प तयार करण्याचे काम करत आहे. मात्र, आरमोरी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या आणि वनपट्ट्याच्या जमिनीवरून रात्रीच्या वेळी अवैध मुरुम उत्खनन करून त्याची वाहतूक करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

              कृष्णा वाघाडे यांच्या म्हणण्यानुसार, जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ३३ हायवा आणि ३ पोकलेन वनपरिक्षेत्र अधिकारी बडोले आणि वनरक्षक पाटील यांनी वाघाडे यांच्या समक्ष पकडले होते. परंतु, या दोन्ही कर्मचाऱ्यांनी ती वाहने तात्काळ जप्त न करता, दुसऱ्या दिवशी सकाळी जप्त करण्यात येतील असे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, आजतागायत ही वाहने जप्त करण्यात आलेली नाहीत. यामुळे, जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर वनगुन्हा दाखल करून, वाहने सोडून देणारे वनपरिक्षेत्र अधिकारी बडोले आणि वनरक्षक पाटील यांना निलंबित करण्याची मागणी कृष्णा वाघाडे यांनी केली आहे.

           आंदोलकांनी केवळ आरमोरीच नव्हे, तर इतर वनपरिक्षेत्रातील गैरव्यवहारावरही बोट ठेवले आहे. पोर्ला गावातील कुंभारबोडी येथील सर्वे क्रमांक २२१ मधील वन जमिनीतून मुरुम उत्खनन करून वनक्षेत्रातील तारांचे कुंपण तोडून मुरुम वाहतूक करण्यात आली. परंतु, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहर आणि क्षेत्र सहायक अरुण गेडाम यांनी आर्थिक हेतूने संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या दोघांनाही तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

          मार्कंडा (कं.) व पेडीगुडम वनपरिक्षेत्रात कोट्यवधी रुपयांची सागवान वृक्षतोड झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यासाठी त्या परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहायक आणि वनरक्षक यांना जबाबदार धरून त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

        या ठिय्या आंदोलनात कृष्णा वाघाडे यांच्यासह शंकर ढोलगे, रवींद्र सेलोटे, विलास भानारकर आणि प्रवीण ठाकरे हे सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. वनविभाग या मागण्यांवर काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

2 thoughts on “जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चरला वनविभागाचा आशिर्वाद..!”

  1. सही किया है, सब काला बाजार कारोबार चल रहा है

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top