गडचिरोली (ता.२४ जुलै) – जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नुकतीच एक अत्यंत जटिल आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. गडचिरोली येथील मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका महिला रुग्णाच्या पोटात केसांचा मोठा गोळा तयार झाल्यामुळे त्यांच्या पोटात तीव्र वेदना आणि फुगवटा निर्माण झाला होता. वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णाचा जीवही जाऊ शकला असता.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्वरीत तपासणी करून डॉ. कृणाल चेंडकापूरे ,सर्जन, यांनी अत्यंत कौशल्याने व धाडसीपणे शस्त्रक्रिया करत सुमारे ५० से.मी.हून अधिक लांबीचा केसांचा गोळा (Trichobezoar) पोटातून यशस्वीरित्या बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक असून, वेळेवर निर्णय आणि डॉक्टरांच्या प्रावीण्यामुळे रुग्णाचा जीव वाचवणे शक्य झाले.
या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ. कृणाल चेंडकापूरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचबरोबर शस्त्रक्रियेत मोलाचे सहकार्य करणारे जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सर्जरी विभागाच्या परिसेविका, भुलतज्ञ, स्टाफ नर्सेस आणि वर्ग ४ कर्मचारी यांचेही विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
ही शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील वैद्यकीय सेवा व उपचारांच्या दर्जाचा उत्तम दाखला असून, ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. मानसिक रुग्णांमधील अशा गुंतागुंतीच्या आजाराकडे गांभीर्याने पाहणे, वेळेवर निदान आणि उपचार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. चेंडकापूरे यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेही या यशस्वी कार्यासाठी विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.