ठेवीदार व सभासदांच्या १.५ कोटी रुपयांच्या ठेवीची फसवणूक

-चाचणी लेखापरीक्षणात उघड झाल्याने संस्थेच्या १८ जणांवर गुन्हे दाखल.

         गडचिरोली, दि. २७: गडचिरोली शहरातील वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (र.नं. ३१८) या संस्थेत तब्बल २.८३ कोटींचा आर्थिक घोटाळा उघड झाला असून संचालक मंडळ, तज्ञ संचालक व लेखापाल यांच्यावर भा.दं.वि. कलम ४२०, ४०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखापरीक्षक श्रेणी-२, सहकारी संस्था अहेरी येथील गजेंद्र रामरावजी काळे यांनी केलेल्या २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या चाचणी लेखापरीक्षणात प्रचंड अनियमितता समोर आली. या अहवालात १.३२ कोटींच्या बुडीत कर्जांचे बेकायदेशीर निर्लेखन व एलआयसी तारणावर संशयास्पद कर्जपुरवठा करून १.५० कोटींचे नुकसान झाल्याचे धक्कादायक निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत.
संचालक मंडळाने २०१२ ते २०२० दरम्यान सभासदांना तारणाशिवाय कर्जवाटप केले. वसुल न झालेली कर्जे कोणतीही कायदेशीर मंजुरी न घेता निर्लेखन करण्यात आली. तसेच एलआयसी धारकांच्या पॉलिसी गहाण ठेवून संस्थेने थेट एलआयसीकडून कर्ज उचलले आणि व्याजाच्या लाखो रुपयांचा बोजा संस्थेवर टाकला. या नियमबाह्य निर्णयांमुळे ठेवीदार व सभासदांची फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चाचणी अहवालानुसार, बुडीत कर्ज निर्लेखनातून १,३२,५४,६५९/- तर एलआयसी तारण कर्जातून १,५०,७६,३७१/- इतकी रक्कम संस्थेच्या नुकसानीत गेली असून, एकूण २.८३ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे नमूद आहे.
या काळात संस्थेच्या अध्यक्षा सौ. गीता बोरकुटे, उपाध्यक्षा सौ. आशा राऊत व कु. चेतना ठाकुर, तसेच १५ संचालिका, तज्ञ संचालक भास्कर खोये आणि लेखापाल राजेंद्र भोयर हे जबाबदार पदांवर कार्यरत होते. यांच्याविरुद्ध गडचिरोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लेखापरीक्षक गजेंद्र काळे यांनी या अनियमिततेबाबत १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच तक्रार केली होती. तपासानंतर अखेर २४ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपींवर फौजदारी कारवाई सुरू आहे.
परंतु संस्थेतर्फे बचावासाठी नियमबाह्यपणे अगोदर हेमंत सौलाखे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गडचिरोली यांनी गुन्हा नोंद करण्यास प्रधिकृत पत्र दिले परंतू संस्थेच्या आर्थिक लाभानंतर नियमबाह्य गुन्हा रद्द करण्याचे पत्र दिले त्यामुळे त्यांचासुद्धा या फसवणूकीत सहभाग असल्याचा दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top