अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक.
गडचिरोली, (चीफ ब्युरो.) दि.२४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. शासन निर्णयानुसार अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.ही योजना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे किंवा तिथे राहण्यास असमर्थ असल्यामुळे पुढील शिक्षण अडथळ्यात येऊ नये, या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक सहाय्य जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
योजनेच्या माध्यमातून ११वी, १२वी तसेच १२ वी नंतरचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील सुविधांप्रमाणेच भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ते आर्थिक सहाय्य देण्यात येते.विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट प्रत (हार्ड कॉपी) निश्चित मुदतीत संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन नोंदणीदरम्यान विद्यार्थी पोर्टलवरील सर्व माहिती परिपूर्ण भरतील, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. माहिती अपूर्ण राहिल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर योजनेतील पात्रतेच्या निकषांनुसार पात्र न ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज थेट अपात्र ठरविण्यात येणार असल्याचीही विशेष नोंद घ्यावी व अर्ज भरण्यात काही तांत्रिक अडचणी आल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
.

