बँक कर्मचाऱ्याचा निर्घृण खून

 – अहेरी तालुक्यात खळबळ

 

             अहेरी(चिफ ब्युरो) दि.२०:- अहेरी तालुक्यात खळबळ उडविणारी धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. “कामासाठी बँकेत जातो” असे सांगून घराबाहेर पडलेले नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार (४९) यांचा निघृण हत्येनंतरचा मृतदेह आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगलात आढळून आला. महामार्गापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आर.डी. जमा करण्याचे काम करणारे रवींद्र हे रविवारी दुपारी घरातून निघाले होते. काही वेळातच त्यांचा मोबाईल बंद झाला. सायंकाळपर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र सोमवारी सकाळी जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर डोके व शरीरावर गंभीर जखमा, एका हाताचे बोट छाटलेले तसेच तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे स्पष्ट दिसून येते. घटनास्थळी दोन ग्लास व दारूची छोटी बाटली आढळून आल्याने हत्या नियोजित की अचानक, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

या घटनेमुळे आलापल्ली–नागेपल्ली परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रवींद्र यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. खुनामागील कारण, आरोपी आणि या क्रूरतेचे सत्य शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करीत असून, या घटनेने अहेरी तालुक्याची शांतता हादरून गेली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top