नदीपात्रात कार कोसळून : भीषण अपघात दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

                  अहेरी(चीफ ब्युरो) दि. २१ :- तालुक्यातील नागेपल्ली येथून अंत्यविधी आटोपून परत जात असताना दीना नदीच्या पुलावरून चारचाकी वाहन थेट नदीपात्रात कोसळल्याने भीषण अपघात झाला. ही घटना आज मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३, रा. आष्टी) व सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५, रा. बोरी) यांचा मृत्यू झाला. तर अभिजीत यादव कोलपाकवार (४०, आष्टी), अर्चना यादव कोलपाकवार (आष्टी) आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार (बोरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या अंत्यविधीनंतर कोलपाकवार कुटुंबीय एम.एच. ३३ व्ही. ८२४९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने आष्टीकडे निघाले होते. दरम्यान खमणचेरू गावानंतर दीना नदीच्या पुलावर वाहनाचा ताबा सुटून ते थेट नदीपात्रात कोसळले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनातील सर्वजण गंभीर जखमी झाले. पुलावर संरक्षण कठडे नसल्यामुळे वाहन थेट खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना यादव विठ्ठलराव कोलपाकवार आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार यांचा मृत्यू झाला. उर्वरित तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
या दुर्दैवी अपघाताने कोलपाकवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 नदीपुल कठड्याविना

नदीपुलावर कोणतेही संरक्षण कठडे नसल्याने पुन्हा एकदा गंभीर अपघाताची नोंद झाली आहे. या अपघातामुळे दीना नदीच्या पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संरक्षण कठडे नसलेले पूल अपघातांना आमंत्रण देत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top