
गडचिरोली(चीफ ब्युरो ) दि.२१ : गडचिरोली शहरातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले असून भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत घडामोडींमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नगर परिषद सभापती पदाच्या वाटपावरून भाजपमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले असून, याच वादातून आमदारांनी माजी जिल्हाध्यक्षांवर हात उचलल्याचा प्रकार घडल्याची जोरदार खमंग चर्चा शहरात सुरू आहे.
नगर परिषद सभापती पदाच्या वाटपासाठी पक्षांतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान सभापती पद कोणाला द्यावे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. चर्चा हळूहळू तीव्र शब्दयुद्धात रूपांतरित झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. वाद इतका विकोपाला गेला की, आमदारांनी माजी जिल्हाध्यक्षांवर हात उचलल्याचे बोलले जात आहे. ही बाब बाहेर येताच संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपमध्ये नेमके काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकरण नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी व उपस्थित नेत्यांनी तातडीने हस्तक्षेप करत मध्यस्थी केली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातून दिली जात आहे. मध्यस्थी झाली नसती, तर हा वाद आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकला असता, अशीही चर्चा आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वीही नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये अशाच प्रकारचे अंतर्गत वाद पहायला मिळाले होते. त्या काळात मतभेद इतके तीव्र झाले होते की पक्षात स्पष्टपणे गट निर्माण झाल्याचे चित्र समोर आले होते. या गटबाजीचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवरही झाल्याची चर्चा होती. आता सभापती पदाच्या वाटपावरून पुन्हा एकदा असा गंभीर प्रकार घडल्याने भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिकच चिघळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
केवळ एका पदासाठी असे टोकाचे वाद होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पदासाठी इतके भांडण सुरू असेल, तर जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सभापती पद मिळवून ‘मलाई’ कशी गिळता येईल, कोण अधिक फायदा करून देऊ शकतो, याच निकषावर निवड होत आहे का? अशा चर्चांनाही उधाण आले आहे.
या घटनेनंतर संबंधित आमदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकप्रतिनिधीकडून अशी आक्रमक व असंयमित वर्तणूक योग्य आहे का? पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर हात उचलण्याची वेळ का आली? तसेच एका पदासाठी पक्षशिस्त व संघटनात्मक संस्कृती धोक्यात टाकली जात आहे का? असे सवाल कार्यकर्त्यांमधूनही पुढे येत आहेत.
नगर परिषद सभापती पदाच्या वाटपावरून पेटलेला हा वाद भाजपासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे असून, पक्ष नेतृत्व या प्रकरणावर काय भूमिका घेते, चौकशी अथवा शिस्तभंगाची कारवाई होते का, याकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
