तालुका मुख्यालयाजवळ रेती तस्करीचा उघड खेळ!

लखमापूर–बोरी घाटातून दिवसा-रात्रो ७–८ ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह 

गडचिरोली ( चीफ ब्युरो) दि. १४: चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लखमापूर–बोरी गावाजवळील घाटातून रात्रो-दिवसा मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दररोज तब्बल सात ते आठ ट्रॅक्टरद्वारे अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जाते.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यात तहसील, महसूल व इतर संबंधित विभागांच्या जवळच हा अवैध धंदा सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.स्थानिकांच्या मते, ही तस्करी रात्री उशिरा सुरू होते आणि पहाटेपर्यंत ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक केली जाते. नदीपात्रातून थेट ट्रॅक्टरमध्ये रेती भरून ती विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत आहे.

या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून “हे सर्व मिलीजुलीने सुरू आहे का?” असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाच्या नजरेआड इतक्या मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी होणे शक्यच कसे? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, तालुक्याच्या मुख्यालयाजवळच सुरू असलेली ही रेती तस्करी प्रशासनाच्या नजरेआड कशी? आणि यावर नेमकी कारवाई कधी होणार?

या अवैध रेती तस्करीमुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून भविष्यात पूरस्थिती किंवा पर्यावरणीय धोके निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून लखमापूर–बोरी घाटातील रेती तस्करीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या परीसरातून जोर धरू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top