ग्रामसभेचा ठराव मंजूर; जनसुविधा योजनेतून तातडीने निधी देण्याची मागणी.
गडचिरोली (चीफ ब्युरो) दि.२७:- तालुक्यातील मौजा नगरी येथील नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या समस्येची दखल घेत ग्रामपंचायत नगरीने जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. १७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत रस्ता दुरुस्तीचा ठराव मंजूर करण्यात आला असून, जिल्हा वार्षिक जनसुविधा योजना किंवा उपलब्ध अन्य निधीतून निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याची सद्यस्थिती पाहता नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने पाहणी करून निधी मंजूर करावा आणि दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आता जिल्हा प्रशासन या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

