व्यायामासाठी गेलेल्या सहा बालकांना मालवाहु ट्रकने चिरडले

       दोन बालके जागीच ठार तर दोन उपचारादरम्यान मृत्यू आणि दोन गंभीर जखमी

गडचिरोली (दि.७) :- गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्ग ३५३सी वरील काटली नजीक गुरुवार ७ ऑगस्ट रोजी पहाटे 4.30 ते 5.00 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव मालवाहू ट्रकने बालकांना चिरडल्याने दोन बालके जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. टिंकू नामदेव भोयर (वय 14), तन्मय बालाजी मानकर (वय 16) असे जागीच ठार झालेल्यांची नावे आहे तर क्षितिज मेश्राम व तुषार मारबते यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, टिंकू भोयर, तन्मय मानकर, क्षितिज मेश्राम, आदित्य कोहपरे, दिशांत मेश्राम, तुषार मारबते सर्व राहणार काटली ता.जि. गडचिरोली हे सहाही जण पहाटेच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी आरमोरी मार्गावर गेले होते. काटली येथील नाल्याजवळ व्यायाम करीत असतांना पहाटे ४.३० ते ५.०० वाजताच्या सुमारास आरमोरी मार्गे गडचिरोली जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रक/ टिप्पर ने त्यांना चिरडल्याने त्यात टिंकू भोयर, तन्मय मानकर हे दोघे जण जागीच ठार झाले तर इतर चार जण गंभीर होते. दरम्यान गंभीर जखमी मधील क्षितिज मेश्राम व तुषार मारबते या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर दोन जण आता मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती आहे. अपघात एवढा भीषण होता कि ठार झालेल्यांची पाय चेंदून गेले.

घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांची मोठी झुंबड घटनास्थळी उसळली होती. या अपघाताने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सदर मालवाहू ट्रक कुठे जात होते हे कळू शकले नाही. गडचिरोली पोलीसांना माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळी दखल होत पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य व अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान या अपघातानंतर गडचिरोली व आरमोरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी या मार्गे धावणाऱ्या मालवाहू ट्रकांना ज्याठिकाणी असेल त्या ठिकाणी थांबण्याचे आदेश देण्यात आले.

गावातील नागरिकांनी मागील ४-५ तासांपासून रस्ता जाम करुन मृत्यूमुखी व जखमी झालेल्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी रेटून धरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top