
पोलिस व महसूल विभाग मौन – ‘आशीर्वाद कोणाचा?’
सावली (दि.२०) :- रेती घाटातून अवैधरित्या रेती घेऊन जाणाऱ्या MH 32 AK 6032 क्रमांकाच्या ट्रकने साखरी – जिबगांव मार्गावर दुचाकीस मागून दिलेल्या जोरदार धडकेत दि.०६/१२/२०२५ रोजी उर्मिला विठ्ठल नागापुरे(४८ )रा. डोनाळा हि महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. धडक इतकी भीषण होती की, उपचारादरम्यान त्यांचा एक पाय कायमचा निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली, मात्र ट्रक चालक पसार झाला अशी माहिती आहे.
वैनगंगा नदीतील रेती उच्च प्रतीची असल्याने सावली तालुक्यातील सामदा, हरंबा, शिरसी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जाते. अशातच तालुक्यातील रेती घाटातून अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू आहे. ट्रक भरून रेती बाहेर जिल्ह्यात पोहोचवली जाते. लाखोंची उलाढाल खुलेआम सुरू असतांना पोलिस आणि महसूल विभागाचे मौन संशयास्पद आहे. अपघात घटनास्थळी पोलीस दाखल झाले, पण कोणती कारवाई केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही.
रेती तस्करीला आशीर्वाद कोणाचा?
सावली तहसीलच्या महसूल विभागाकडूनही याबाबत कोणतीही आकस्मिक दखल किंवा कारवाई न झाल्याचे समजते त्यामुळे संताप अधिकच वाढला आहे. अवैध वाळूची लई लूट सुरू असताना महसूल विभाग “झोपेत” असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. ही रेती तस्करी केवळ बेफिकीरीने होत नाही, तर यामागे कोणाचे तरी संरक्षण आहे अशी लोकचर्चा होत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून काही प्रभावशाली मंडळी व विशिष्ट गट या अवैध वाहतुकीला थेट किंवा अप्रत्यक्ष आशीर्वाद देत आहेत, म्हणूनच कारवाई न होता हा धंदा दिवसाढवळ्या सुरू आहे.
या अवैध रेती वाहतुकीला ‘आशीर्वाद कोणाचा? पोलिसांचा, महसूलचा, की राजकीय? असा सवाल उपस्थित होत आहे. अपघातात महिलेचा पाय निकामी झाला, अपघात झाला, ट्रक चालक मोकाट पळतो, नागरिकांना मुलभूत न्यायही मिळत नाही. परीसरातील नागरीकांनी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा अद्यापही कारवाई नाही.त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीला थांबविण्यासाठी सक्षम कारवाईची मागणी जोर धरत असून या गंभीर प्रकरणाची जिल्ह्याचे पोलिसअधीक्षक दखल घेणार काय ? या कडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
