
गडचिरोली(चीफ ब्युरो) दि.०५:– राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३६वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह दिनांक ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत अभिनव लॉन, विद्या भारती शाळेजवळ, गडचिरोली येथे साजरा करण्यात येणार आहे.
या शैक्षणिक सप्ताहात महाराष्ट्रातील १५ अंध विद्यालयांमधील इयत्ता इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतचे १५० विद्यार्थी सहभागी होणार असून सोबत १०० मार्गदर्शक सुद्धा सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या संपूर्ण उपक्रमाची व्यवस्था गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक संस्था व वैयक्तिक दानदाते यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन तसेच बक्षिसांची संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. या पत्रकाच्या माध्यमातून राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार शाखा गडचिरोली यांच्या वतीने समस्त जनतेला सहकार्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गडचिरोलीवासीयांच्या मनोरंजनासाठी दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रोशनी म्युझिकल ग्रुप, नागपूर यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी उदात्त हेतूने मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने सहकार्य करावे, असे आवाहन भोजराज पाटील (उपाध्यक्ष, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र), सुहास खरे (अध्यक्ष, माऊली मित्र मंडळ, नागपूर), निरंजन वासेकर (अध्यक्ष, मैत्री परिवार गडचिरोली), अविनाश चडगुलवार (सचिव, मैत्री परिवार गडचिरोली), अश्विनी भांडेकर (महिला प्रमुख), प्रकाश मुद्दमवार (सभासद) व प्रमोद धात्रक (सभासद, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ) यांनी केले आहे.
