L
गडचिरोली (ता. १४जुलै) : होमिओपॅथी डॉक्टरांनी सीसीएमपी सारखी कठीण परिक्षा उत्तीर्ण करून सुद्धा शासनाने त्यांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (MMC) नोंदणीसाठी अडथळा निर्माण केल्याने १६ जुलै २०२५ पासून मुंबईतील आझाद मैदानावर पुकारलेल्या आमरण उपोषणाला गडचिरोली जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. सोमवारी (ता. १४ जुलै) इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
उपोषण मागचे कारण: होमिओपॅथी डॉक्टरांची सीसीएमपी कोर्स नुसार नोंदणी आणि आयएमए संघर्ष
डॉ. शहा यांचे उपोषण सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी) उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील (MMC) नोंदणीवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) केलेल्या विरोधाच्या निषेधार्थ आहे. या प्रकरणी आयएमएने “खोट्या व अर्धसत्य माहिती” च्या आधारावर प्रसारमाध्यमे आणि आंदोलनांद्वारे राज्य शासनावर दबाव आणल्याचा आरोप डॉ. शहा यांनी केला आहे. यामुळे सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला असून, गेल्या आठ वर्षांपासून एमएमसीने कायद्याची पायमल्ली करत सीसीएमपी अर्हताधारकांची नोंदणी करण्यास टाळाटाळ केली असल्याचा दावा डॉ. शहा यांनी केला आहे.
सीसीएमपी अभ्यासक्रम: कायदेशीर मान्यता आणि सक्षमता
सीसीएमपी अभ्यासक्रम हा महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने संमत केलेल्या कायद्यानुसार तयार करण्यात आला असून, त्याला शासनाची पूर्ण मान्यता आहे. २०१७ पासून हजारो डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा अभ्यासक्रम साडेपाच वर्षांच्या एमबीबीएस समतुल्य होमिओपॅथी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एक वर्षाचा क्लिनिकल रोटेशन आणि प्रात्यक्षिकासह आधुनिक चिकित्सा पद्धतीतील औषधशास्त्राचा समावेश करतो.सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक यांनी बनवलेला आहे त्यामुळे हे डॉक्टर आधुनिक चिकित्सा पद्धतील प्रथमोपचार व रुग्णोपचार एलोपॅथी सक्षम असल्याचा दावा जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत केला.
आयएमएने हा शासन निर्णय किंवा सीसीएमपी अभ्यासक्रम रद्द करण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. ‘होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलन’ आणि गडचिरोलीचा पाठिंबा डॉ. शहा यांनी या उपोषणाची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे दिली आहे. ‘होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलन’ या नावाने हे उपोषण करण्यात येणार असून, गडचिरोली जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
या पत्रकार परिषदेला डॉ. तामदेव दुधबळे, डॉ. वरुण राव दूधबळे, डॉ. सत्यविजय दूधबळे, डॉ. गणेश सातपुते, डॉ. संदिप भांडेकर, डॉ. सुशील शेंडे, डॉ. अंचित विश्वास, डॉ. कमलाकर रोडे, डॉ. आर. डी. मुनघाटे, डॉ. के. व्ही. कोहळे, डॉ. प्रणित बॅनर्जी, डॉ. संदीप ठाकरे, डॉ. प्रमोद धोडरे, डॉ. मिथुन रायसिडाम, डॉ. रवींद्र पाछळ, डॉ. रवी बुर्लावार आदी उपस्थित होते.