व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेवत दिले
चक्का जाम आंदोलनास समर्थन.
गडचिरोली (ता.०१):- आलापल्ली – आष्टी – मुलचेरा मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पूर्ण रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे या मार्गांवर अपघाताचे सत्र सुरूच असुन अनेकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला.सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देवूनही त्यांना जाग न आल्याने अखेर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेने मुलचेऱ्यात दिनांक 1 सप्टेंबर रोजी चक्का जाम आंदोलन केले. गौरव बाला यांच्या कार्यालयापासून शिवसैनिक मुलचेरा येथील मुख्य चौकात आले व दुपारी साडेबारा वाजता चक्का जाम आंदोलनास सुरवात झाली. यावेळी आंदोलन कर्त्यानी अकार्यक्षम प्रशासनाविरोधात नारेबाजी करत घोषणा दिल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे,सह संपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, बंगाली आघाडी जिल्हा प्रमुख असिद मिस्त्री चामोर्शी तालुका प्रमुख पप्पू भाऊ पठाण मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला व संदीप कोरेत यांच्या नेतृत्त्वात झाले आंदोलन.
यावेळी आंदोलकांना संबोधित करताना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी आलापल्ली – मुलचेरा – आष्टी मार्गांवर मोठया प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले असताना प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहेत. आम्ही वारंवार निवेदन देवुनही प्रशासनाने साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी सर्वसामान्याच्या प्रश्नावर शिवसेना रस्त्यावर उतरेल असे सांगितले. व मुलचेरा परीसरात नागरिकांना या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होणाऱ्या त्रासदायक अनुभव कथन केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी यावेळी प्रशासनाला धारेवर धरत या मार्गावर जे जीवघेणे खड्डे पडले आहे ते लवकरात बुजवावे, शिवसेना जरी सत्तेत असली तरी जनतेचा आवाज बुलंद करण्यासारखी प्रशासनाने जर निवेदन देवुनही कोणतीही कार्यवाही करत नसेल तर जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असा निर्वाणीचा इशारा दिला. व येत्या आठ दिवसात हे खड्डे न बुजविल्यास गडचिरोली येथील सार्वजानिक बांधकाम विभागाच्या मुख्यअभियंत्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगीतले.
शिवसेना सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार यांनी यावेळी संबोधित करतांना आम्ही जरी सत्तेत असलो तरी जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर आम्ही रस्त्यावर येवून प्रश्न सोडवू असे सांगत गेल्या चार वर्षापासून हा मार्ग खड्ड्यात गेला.
प्रशासन याची साधी दखल घेत नसेल तर या मुजोर प्रशासनाविरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू व त्यांना वठणीवर आणू. रस्त्याची एवढी दुरावस्था झाली असताना येथील आमदार महोदय याकडे दुर्लक्ष करीत झोपा काढत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. व सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व या भागातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी येणाऱ्या काळात शिवसेना यापेक्षा मोठे आंदोलन करेल असे सांगीतले.
या चक्काजाम आंदोलनाची दखल घेत आलापल्ली सार्वजानिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. जी मुंदडा हे आंदोलनस्थळी आले. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात आलापल्ली – मुलचेरा – आष्टी या मार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील आश्वासन आंदोलनकर्त्याना दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे व मूलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरत सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळू नका. आणि जुजबी उत्तरे देवू नका या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चालढकल केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येइल असा निर्वाणीचा इशारा दिला. यावेळी मुलचेऱ्याचे तहसिलदार चेतन पाटील घटनास्थळी भेट दिली व आंदोलन कर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मुलचेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार महेश विधाते, आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे हे आंदोलनस्थळी उपस्थित राहून चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक भारसाकडे, सागर मुरकुटे,नगरसेवक देवा चौधरी, नगरसेविका सौ. सुनीता कोकेरवार, नगरसेवक कन्नाके काकाजी, संजीव पोद्दार, अरुण धूर्वे, अनंत बेझलवार, विजय बहिरेवार, दीपक बीश्वास, कृष्णा वाघाडे, कपिल पाल, संतोष बारापात्रे, मोहन आचेवार, महेश चहारे, जगदीश ताकलपल्लीवार, गणेश येलेकर,अरुण शेडमाके, नंदू सिडाम, साईनाथ औतकार, आदी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

