
– आरोग्यमंत्र्यांकडे नवनिर्मिती अहेरीतील महिला व बाल रुग्णालयातील कुशल व अकुशल पदे नाकारण्याची तक्रार
गडचिरोली (ता.०१):- गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे एमव्हीजी कंपनीमार्फत कुशल व अकुशल पदे भरण्यात आली आहे़. मात्र सदर कंपनीद्वारे संबंधित कामगारांना कमी वेतन देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे़. किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन दिला जात नसल्याचा आरोप करीत असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी थेट आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करीत संबंधित कंपनीला अहेरी येथील नियोजित महिला व बाल रुग्णालयातील पदभरतीला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे़.
आरोग्य मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत पेंदारकर यांनी म्हटले आहे की, कमागारांना शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे आवश्यक असतांनाही कमी रक्कमेवर काम करुन घेतले जात आहे़. याबाबत कामगारांनी अनेकदा तक्रारी करुनही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.तसेच चुकीचा करारनामा जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या मार्फत करण्यात आला. त्यांनी अगोदरच करारनामा रद्द करण्याची प्रक्रिया करायला हवी परंतु त्यांनी उलट त्याच कंपनीला महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे पुन्हा कुशल-अकुशल पदे भरण्याची परवानगी देण्यात आली. आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार एमव्हीजी कंपनीला गडचिरोलीसह महिला व बाल रुग्णालयात कुशल व अकुशल मनुष्यबळ पुरविण्याची मान्यता देण्यात आली आहे़. मात्र अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास करार तात्काळ रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत़ असे असतांनाही त्याच कंपनीला अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात पदे भरण्याची परवानगी देण्यात आली आहे़. त्यामुळे या पदभरतीला स्थगिती देऊन कंपनीची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कुणाल पेंदारकर यांनी दिला आहे़.
‘त्या’ व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल करा.
असे तक्रारींमध्ये पेंदोरकर यांनी म्हटले आहे की, नाशिक येथील एमव्हीजी कंपनीचा व्यवस्थापक म्हणून संतोष अहिरे काम बघतो़ मात्र त्याचा कंपनीच्या नोंदणीत कुठेही व्यवस्थापक म्हणून त्याचा नाव नाही. सदर व्यक्ती कंपनीचा सभासद नसतांनाही करारनामा कसा करु शकतो. सदर प्रकारे शासनाची दिशाभूल करणारा असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी करुन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्यायादीत टाकण्याची मागणीही कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे़.
