डॉ. किलनाके व डॉ. देवरी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी; सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी यांचा पत्रकार परिषदेत संताप
गडचिरोली (चीफ ब्युरो)दि २४: चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि वैद्यकीय हलगर्जीपणामुळे एका २७ वर्षीय मातेसह तिच्या नवजात बालकाला नाहक प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जामगिरी येथील जिजा हंसराज सातर (वय २७) व त्यांच्या नवजात शिशूचा वेळेवर उपचार न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाला. या दुहेरी मृत्यूला जबाबदार असणारे डॉ. किलनाके आणि डॉ. देवरा यांच्यावर तात्काळ कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी व मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली.
नेमकी घटना काय?
जिजा सातर यांना प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर २३ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे वेळेवर आवश्यक उपचार न देता सकाळी १०:३० वाजता प्रकृती खालावल्याचे कारण पुढे करत गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानंतर रुग्णालयात प्रसूती प्रक्रिया पार पडल्यानंतर, संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाळ दगावल्याची बातमी मातेला दिली. हा धक्का सहन न झाल्याने जिजा यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली. परिचारिकेने याबाबत कर्तव्यावरील डॉक्टरांना तात्काळ माहिती देऊनही डॉक्टरांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर प्रशासनाने घाईघाईत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले; मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता आणि अखेर उपचारादरम्यान त्या मातेचीही प्राणज्योत मालवली.
डॉ. किलनाके यांच्या वादग्रस्त कारभारावर बोट पत्रकार परिषदेत बोलताना अमिता मडावी यांनी डॉ. किलनाके यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. डॉ. किलनाके हे यापूर्वीही अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिलेले असून, त्यांच्या अशा बेफिकीर वृत्तीमुळेच आज एका निष्पाप मातेला व तिच्या बाळाला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांनी केला.
“ही केवळ एका कुटुंबावर ओढवलेली शोकांतिका नसून गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे उघडे पडलेले विदारक वास्तव आहे. वेळीच योग्य उपचार आणि संवेदनशीलता दाखवली असती, तर आज माता आणि बाळ दोघेही सुरक्षित राहिले असते. या प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष वैद्यकीय चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.” — अमिता मडावी, सामाजिक कार्यकर्त्या
कुटुंबीयांची मागणी आणि उपस्थिती
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची २४ तास उपलब्धता आणि रेफरल यंत्रणेतील त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला मृत महिलेचे पती हंसराज सातर, आई सोनिबाई कंगाले, जाऊ जिजाबाई लोनबले, नातेवाईक शरद काशिनाथ कस्तुरे यांच्यासह पीडित सातर कुटुंबीय उपस्थित होते. न्याय न मिळाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

