चामोर्शीत संत निरंकारी मिशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर

‘रक्तदान हेच मानवसेवेचे श्रेष्ठ कार्य’; युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.

             चामोर्शी (चीफ ब्युरो) दि.१२ :-  मानवतेची सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने संत निरंकारी मिशन नवी दिल्ली, शाखा चामोर्शी यांच्या वतीने रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संत निरंकारी सत्संग भवन, चामोर्शी येथे पार पडणार आहे.

सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या प्रेरणेतून संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून देश-विदेशात विविध मानवतावादी आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच सेवाभावी परंपरेत चामोर्शी शाखेतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिरासोबतच आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान आणि इतर सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे आणि जीवनदायी कार्य आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाच्या उपचाराला मदत होऊ शकते. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त युवकांनी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संत निरंकारी मिशनचे झोनल इन्चार्ज श्री. किशन नागदेव जी आणि ब्रांच मुखी श्री. अशोक बोरकुटे यांनी केले आहे.

‘मानवतेची सेवा हीच खरी सेवा’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top