अनधिकृत बांधकामप्रकरणी शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

गडचिरोली (चीफ ब्युरो) दि.०९ : गडचिरोली नगर परिषदेच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती शिल्पा अंकित हेमके यांच्या कथित अनधिकृत बांधकामप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे नगरसेवकपद रद्द व अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने पत्रकार परिषदेत केली.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी सांगितले की, जिल्हा सहआयुक्त (न.प. प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालयाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली यांना मौजा गडचिरोली येथील सर्वे क्रमांक ११/१-क, भूखंड क्रमांक ६६ वरील बांधकामाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर भूखंड नगर परिषदेकडे गहाण राखीव असतानाही बांधकाम करण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला. तसेच बांधकामाची परवानगी व मंजूर नकाशाबाबत चौकशी करून हेमके दाम्पत्याच्या भूमिकेची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही पक्षाने दिला.

दरम्यान, शिल्पा हेमके यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “भूखंडावर तात्पुरते बांधकाम असून लेआउटच्या कामाचे साहित्य ठेवण्यासाठी ते करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या नोटीसविरोधात गडचिरोली सेशन कोर्टात आव्हान दिले आहे. न्यायालयाचा निर्णय मान्य राहील. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला अॅड. संजय जनबंधू, अरविंद वाळके, चंद्रप्रकाश गेडाम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top