गडचिरोली नगर परिषदेत बोगस शिक्षक भरतीचा आरोप; भरती रद्द करून चौकशीची मागणी

ठरावापूर्वीच मुलाखती, जाहिरात न देता १८ शिक्षकांना रुजू केल्याचा आरोप ; नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.

 

गडचिरोली (चीफ ब्युरो)ता.१६:-गडचिरोली नगर परिषदेतील कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप नगरसेवक तथा शिक्षण समिती सदस्य बाळू टेंभुर्णे यांनी केला आहे. नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, शिक्षण समिती सभापती हर्षल गेडाम आणि मुख्याधिकारी यांनी संगनमत करून शासनाच्या नियमांना डावलत बोगस पद्धतीने शिक्षक भरती केल्याचा आरोप त्यांनी जिल्हाधिकारी अविश्यंत पांडा यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केला आहे.

तक्रारीनुसार, गडचिरोली नगर परिषदेने विविध विभागांसाठी मनुष्यबळ पुरविणाऱ्या मे. यशश्री एंटरप्राईजेस, सोलापूर या संस्थेशी २८ एप्रिल २०२६ रोजी ई-निविदेद्वारे करार केला होता. त्यानंतर नगर परिषदेच्या काही शाळांमध्ये नववी-दहावी तसेच इतर वर्गांसाठी कंत्राटी शिक्षक भरतीचा ठराव ३० जून २०२६ रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

मात्र, या ठरावापूर्वीच म्हणजे २९ जून रोजी कोणतीही सार्वजनिक जाहिरात किंवा अधिकृत पत्रव्यवहार न करता मुलाखती घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित एजन्सीलाही अंधारात ठेवून काही निवडक उमेदवारांना बोलावून मुलाखती घेतल्याचे टेंभुर्णे यांनी म्हटले आहे.

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, कोणतेही नियुक्तीपत्र न देता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत तोंडी आदेश देऊन १८ उमेदवारांना कामावर रुजू करण्यात आले. नियुक्तीचा कोणताही अधिकृत पुरावा नसतानाही संबंधित उमेदवारांनी काम सुरू केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय, शिक्षण समिती सभापती, शिक्षण विभागाचे प्रमुख तसेच नगर परिषदेतील दोन मुख्याध्यापक यांनी शासन नियमांचे पालन न करता दबावाखाली मुलाखती घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करून ती रद्द करावी, नव्याने पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, तसेच संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि कंत्राटी एजन्सीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बाळू टेंभुर्णे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी सांगितले की, “सदर शिक्षक भरती प्रक्रिया ही कंत्राटी स्वरूपाची असल्याने नगर परिषदेमार्फत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर मुलाखतीचा तपशील व शिफारस मे. यशश्री एंटरप्राईजेस, सोलापूर यांना पत्राद्वारे कळविण्यात आली आहे.”

मात्र, या स्पष्टीकरणानंतरही भरती प्रक्रियेत नियमांचे पालन झाले का, ठरावापूर्वी मुलाखती का घेण्यात आल्या आणि नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता होती का, याबाबतची चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी या प्रकरणात कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top