२२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; कारगिल स्मारकातून शहीदांना अभिवादन.

२७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीच्या उत्साहात साजरा; उदय धकाते यांच्या कार्याचा सर्वपक्षीय मान्यवरांकडून गौरव.

गडचिरोली (चीफ ब्युरो)ता.२७:कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करत गडचिरोली येथे २७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात हजारो नागरिक, माजी सैनिक, विद्यार्थी, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.

यंदाच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरले ते कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते. गडचिरोलीत कारगिल स्मारक उभारण्यासाठी त्यांनी तब्बल २२ वर्षे शासनदरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा आणि संघर्षाचा सर्व मान्यवरांनी मुक्तकंठाने गौरव केला.

सन २००० पासून सुरू झालेल्या या लढ्याला २०२२ मध्ये यश मिळाले आणि आज उभे असलेले कारगिल स्मारक हे जिल्ह्याच्या देशभक्तीचे प्रतीक बनल्याचे वक्त्यांनी नमूद केले. शहीदांच्या स्मृती चिरंतन जपणारे आणि भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची प्रेरणा जागवणारे हे स्मारक गडचिरोलीच्या इतिहासातील एक अभिमानास्पद ठेवा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा गांधी चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य कारगिल विजय रॅलीने झाली. रॅलीत शालेय विद्यार्थी, युवक, नागरिक आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कारगिल चौकातील शहीद स्मारकावर पोहोचल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने भावपूर्ण अभिवादन केले.

मुख्य कार्यक्रमात वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून शहीदांना मानवंदना दिली.

कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, लेफ्टनंट कर्नल रामनाथ स्वामी, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक कृष्णा रेड्डी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, वीरपत्नी श्रीमती चंदनखेडे, व्यापारी संघटनेचे घिसूलाल काब्रा, होमराज डोनाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘कारगिल स्मारक म्हणजे राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्थान’

आपल्या मनोगतात सर्व मान्यवरांनी सांगितले की, “उदय धकाते यांनी अथक जिद्द, सातत्य आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून उभारलेले कारगिल स्मारक हे केवळ स्मारक नसून शहीदांच्या शौर्याची साक्ष देणारे राष्ट्रीय प्रेरणास्थान आहे. गेली २७ वर्षे ते देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी अविरत कार्य करत असून अशा उपक्रमांमुळे भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होत आहे.”

कार्यक्रमाला विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, माजी सैनिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top