अहेरीतून विदर्भ मुक्तीचा हुंकार; स्वतंत्र राज्यासाठी २०२७ पर्यंत आरपारचा लढा

 

८ नोव्हेंबरला अहेरीत ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’; ११ जिल्हे, १२० तालुक्यांत जनजागरणाची घोषणा

 

गडचिरोली (चीफ ब्युरो)दि.०५: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला निर्णायक वळण देण्यासाठी ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला आहे. या मागणीसाठी विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांत व्यापक जनजागरण मोहीम राबविण्यात येणार असून, त्याचाच एक भाग म्हणून ८ नोव्हेंबर रोजी अहेरी येथे ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

अहेरी येथील महागाव रोडवरील इंडियन पॅलेस फंक्शन हॉलमध्ये दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप राहणार आहेत. ‘देशोन्नती’चे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्यासह विदर्भ आंदोलनातील विविध पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

अहेरीतून पुन्हा आंदोलनाची ज्योत पेटणार

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा ऐतिहासिक संदर्भ अधोरेखित करत समितीने सांगितले की, माजी खासदार राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी १९५७ मध्ये नागविदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भासाठी लोकलढा उभारला होता. त्यानंतर माजी आमदार राजे सत्यवानराव आत्राम यांनीही ही चळवळ पुढे नेली. या ऐतिहासिक वारशाच्या पार्श्वभूमीवर अहेरीतून पुन्हा विदर्भ आंदोलनाची ज्योत पेटविण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.

२८ सप्टेंबरला ‘नागपूर करार होळी’ आंदोलन:-

नागपूर करारातील आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करीत २८ सप्टेंबर रोजी विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांत ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले. या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कर्ज, अनुशेष आणि रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर:-

महाराष्ट्रावरील वाढते कर्ज, विदर्भातील सिंचन व इतर क्षेत्रांतील अनुशेष तसेच राज्यातील पोलीस दलातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांचा दाखला देत स्वतंत्र विदर्भ हाच विकासाचा पर्याय असल्याचा दावा समितीने पत्रकार परिषदेत केला.

या पार्श्वभूमीवर विदर्भातील नागरिक, युवक, महिला आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी ८ नोव्हेंबरच्या अहेरी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वतंत्र विदर्भाच्या जनसंकल्पाला बळ द्यावे, असे आवाहन समितीने केले आहे.

पत्रकार परिषदेला अरुण मुनघाटे, अशोक पोरेड्डीवार, कपील इद्दे, प्रकाश ताकसांडे, चंद्रशेखर भडांगे, सुनील पोरेड्डीवार, मारोतराव बोथले, मोतीराम लाटेलवार आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top